पुणे विद्यापीठ कुलगुरुची डेडलाईन संपली, विद्यार्थी-कर्मचा-यांसाठी करणार धरणे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pune-university.jpg)
अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचा इशारा
पुणे ( महा ई न्यूज ) – विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचा-याच्या विविध मागण्यांकडे पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. एन.आर.करमळकर यांनी गेल्या पाच महिन्यापासून दुर्लक्ष केले आहे. याबाबत कुलगुरु, प्र. कुलगुरु या दोघांनाही पत्र देवून 10 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेतला नाही. तर 15 सप्टेंबरनंतर कोणत्याही क्षणी कुलगुरुच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय झेंडे व सचिव आनंदा अंकुश यांनी दिला आहे.
यासंर्दभात पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व संघटनेने 7 मार्च 2018 रोजी झालेल्या सभेतील विविध मागण्यांवर आजही कुलगुरुनी प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. विद्यार्थी व कर्मचा-याच्या मागण्यांवर निवेदन दिले, स्मरण पत्र दिले, तरीही कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आक्रमक भुमिका घेतली असून आता कुलगुरुच्या कार्यालयात कोणत्याही धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तसेच आॅनलाईन प्रश्नपत्रिकांमुळे पेपर उशिरा चालू होवून संपुर्ण प्रशासन यंत्रणेला त्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पेपरची वेळ एक तास अगोदर घ्यावा, अॅंडमिट कार्ड प्रिंट ई-मेलवर विद्यापीठाकडून पाठविण्यात यावे, कर्मचा-याचे 80 टक्के मानधन मिळावे, विद्यापीठाचे आर्थिक व्यवहार केवळ प्राचार्याच्या सहीने चालू राहावेत, परीक्षा कालावधीत पेपरची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र गाडी सुरु करावी, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पुर्नपडताळणीचे निकाल तात्काळ देण्याची सोय करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या अॅडमिट कार्डमधील नावाच्या दुरुस्तीची सुविधा महाविद्यालयाकडे द्यावी, विद्यापीठ परीक्षेच्या वेळेस इनवर्डची तारीख संपल्यावर दोन दिवस वाढवून मिळावी, विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षेचे पेपर झेराॅक्स करणा-या कर्मचा-याला काॅम्प्युटेशन फॅसिलिटीचे दर वाढवून मिळावेत, महाविद्यालयीन कर्मचा-याला विद्यापीठ गेस्ट हाऊस विनामोबदला मिळावे, काॅपी केस झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ निकालानंतर सात दिवसात प्रक्रिया राबवावी, विद्यापीठ परीक्षेची बिले तपासणीसाठी कॅम्प लावण्यात यावा, त्या बिलामध्ये ज्या त्रुटी राहतात त्या कॅम्पमध्ये पुर्ण केल्या जातील,
यासह विविध प्रश्नावर कुलगुरु आणि प्र-कुलगुरु यांनी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांना येणा-या अडचणी व विद्यार्थी हीत लक्षात घेवून सकारात्मक विचार करुन योग्य तीन कार्यवाही करावी, असेही मागणी निवेदनाद्वारे कर्मचारी महासंघाने केली आहे.