पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला!
पुणे – पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानातील पुतळ्यावरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अज्ञातांनी रात्री संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यानंतर पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. त्यामुळे आता पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करुन, गडकरींचा पुतळा उद्यानातून हटवण्यात आला होता. राम गणेश गडकरी यांनी नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरुन दोन वर्षांपूर्वी मोठा वादही निर्माण झाला होता. त्यानतंर, राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा संभाजी उद्यानात बसवावा, अशी मागणीही काही संघटनांकडून करण्यात आली होती. मात्र, काही संघटनांनी गडकरींचा पुतळा बसवण्यास विरोध केला होता.
एकीकडे गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात बसवायचा की नाही, यावरुन गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरु असताना, आता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अज्ञातांनी रात्री संभाजी उद्यानात बसवला. त्यानंतर पोलिसांनी महाराजांचा पुतळा हटवला. त्यामुळे आता नव्याने वाद सुरु झाला आहे.