पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक संस्था 14 मार्च पर्यंत राहणार बंद, आयुक्तांचा आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/pcmc-1-20.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
कोवीड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविदयालये यांचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग १ मार्च ते १४ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आज आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाद्वारे ऑनलाईन शिक्षणास मुभा देण्यात आली आहे.
साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील काही काळ निर्बंध आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण अथवा सेवा वगळता १ मार्चपासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, दुध, भाजीपाला, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-यांना, वृत्तपत्र सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणा-या आस्थापना व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात आले आहे. तसेच, ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचा-यांना आणि त्यांची ने-आण करणा-या वाहनांना देखील या आदेशामधून वगळण्यात आले आहे. तथापि, वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत कायम असल्याचेही आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत शासन तसेच महापालिकेने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश तथा मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. सदर आदेशाचा कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी भंग अथवा उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा, १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व कायद्यातील इतर नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी २८ फेब्रुवारी म्हणजे आजपासून लागू करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
पुणे महापालिका हद्दीतही घेतला निर्णय
पुणे महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी क्लासेस 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापौरांनी ट्विट केले आहे