पीएमपी कर्मचा-यांच्या बोनससाठी दोन्ही पलिकांकडे थकीत रकमेची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/pmp-bus_2017087018.jpg)
पुणे ( महा ई न्यूज ) – बोनस व बक्षीस रकमेसाठी मागील वर्षी न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचा-यांना यावर्षी संघर्ष करावा लागणार नाही, असे दिसते. कर्मचा-यांना बोनस देण्याइतपत ‘पीएमपी’ची स्थिती चांगली नसल्याने प्रशासनाने दोन्ही पालिकांकडे थकीत असलेल्या सुमारे ३३ कोटींची मागणी केली आहे. ही रक्कम वेळेत मिळाल्यास कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.
‘पीएमपी’ची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मागील वर्षी तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बोनस व बक्षिस रक्कम न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कामगार संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजुने निर्णय दिला. त्यावर प्रशासन उच्च न्यायालयात गेल्याने बोनसचा मुद्दा चिघळला होता. पण दोन्ही महापालिकांनी ३१ कोटी रुपये देण्याची विशेष तरतूद केली. यामध्ये १९ कोटी रुपये पुणे पालिका तर १२ कोटी रुपये पिंपरी-चिंचवड पालिकेने दिले. यापुढील काळात कंपनीची आर्थिक स्थिती पाहून कर्मचा-यांना बोनस द्यायचा किंवा नाही, याचा सर्वस्वी निर्णय पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक घेतील, असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले.