कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/15723326_1219938401425364_5871297962518930210_o.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे साठे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, साठे यांच्यावर तडाकाफडकी राजीनामा देण्याची वेळ का आली याबाबत पक्षांतर्गत सर्वांनी मौन बाळगले आहे.
गेल्या साडेतीन वर्षापासून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पद सचिन साठे यांच्याकडे आहे. महापालिकेतील पराभवानंतर साठे यांनी पक्षाला डळमळीत न होऊ देता एकेक कार्यकर्ता टिकवून ठेवला. महापालिका निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला सोडचिट्टी देऊन भाऊसाहेब भोईर आपल्या नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत गेले. त्यांच्यानंतर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी साठे यांनी पेलली. मात्र, दुर्दैवाने पालिका निवडणुकीत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. पूर्णतः अपयश आल्याने साठे यांनी त्याचवेळी नैतीकता पाळत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे दिला होता. मात्र, तो पक्षाने स्वीकारला नव्हता.
त्यावर आज मुंबई येथे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीची बैठक होती. पक्षाचे निरीक्षक, ब्लॉक अध्यक्ष यांच्या बैठकीतच साठे यांनी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. वैयक्तीक कारणास्तव पक्षाकडे लक्ष देता येत नसल्याचे कारणही त्यांनी समोर केले आहे.