पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/pcmc-03.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने येत्या 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान माजी महापौर कै. मधुकर रामचंद्र पवळे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुरूष खेळांडुचे 30 संघ तर महिला खेळाडुंचे 20 अशा एकूण 50 संघांचा स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुड पक्षनेते एकनाथ पवार आणि क्रिडा समिती सभापती संजय नेवाळे यांनी दिली.
या कबड्डी स्पर्धा पूर्णानगर येथील शनिमंदिर मैदानावर होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहेत. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, खासदार अमर साबळे हे उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण 50 संघातील महिला व पुरूष असे 700 खेळाडू सहभागी होणार आहे. खेळाडुंच्या निवासाची सोय चिखलीतील सेक्टर 17 येथील घरकुल योजना याठिकाणी केली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षिस 1 लाख 75 हजार, द्वितीय 1 लाख, तृतीय 55 हजार 555 आणि चतुर्थ 55 हजार 555 असे बक्षिसांचे स्वरूप आहे. वैयक्तीक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात दिवसाचा मानकरी (महिला व पुरूष) 4 दिवस 40 हजार, उत्कृष्ट चढाई किंवा पकड शिवाय अष्टपैलू खेळाडू ठरणा-याला महिला व पुरूष खेळाडुंना 45 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. खेळाडुंना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही, याची व्यवस्था केली आहे, अशीही माहिती पवार आणि नेवाळे यांनी सांगितली.