पिंपरी-चिंचवड महापालिकेला 50 वर्ष पूर्ण, स्व. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला साधा पुष्पहार नाही
- सत्ताधारी भाजपचा व्यक्तीभेद चव्हाट्यावर, राष्ट्रवादीचा आरोप
- महापालिका प्रशासनालाही पडला याचा विसर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा उर्मट कारभार आता नागरिकांच्याच डोळ्यावर येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला आज 4 मार्च 2020 रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षात शहराचे शिल्पकार स्व. अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला साधा पुष्पहार अर्पण केला नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासनाला याचा विसर पडला की काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ज्यांनी पिंपरी-चिंचवड नगरपालिका या छोट्याशा रोट्याचे वटवृक्षात रुपांतर केले ते महान पुरूष आणि पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार स्व. अण्णासाहेब मगर यांच्या जयंती दिवशी देखील त्यांच्या पुतळ्याला साधा पुष्पहार घालण्याचे औदार्य पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी दाखविले नव्हते. पालिकेतील सत्तेची मलाई लाटणा-या सत्ताधा-यांना विसर पडल्याचे आजपर्यंतच्या पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. त्यामुळे भाजपच्या कारभारावर समाजातून टिका टिपन्नी होत आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने महापुरूषांची जयंती व राष्ट्रीय दिनाबाबत 26 डिसेंबर 2018 ला प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये अण्णासाहेब मगर यांच्या जयंतीचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांची जयंती साजरी केली नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. अण्णासाहेब मगर यांनी दूरदृष्टी ठेवून नगरपालिका स्थापन केली. त्यानंतर त्याचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने झाला. अण्णासाहेब मगर हे शहराचे शिल्पकार आहेत. त्यांनी शहराची जडणघडण केली नसती तर सत्ताधारी म्हणून भाजपच्या पदाधिका-यांना पालिकेवर हक्क गाजवता आला असता का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
भाजपची सत्ता असताना त्यांच्या वतीने अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला साधा पुष्पहार अर्पण होऊ नये, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. अण्णासाहेबांनी जडणघडण केलेल्या पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे आज महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्याला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. याचा विसर सत्ताधा-यांना पडावा एवढे दुर्दैव अन्य कोणत्या गोष्टीचे नाही. राष्ट्रवादीच्या वतीने या कृत्याचा निषेध आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह पक्षाचे काही पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आम्ही पुष्पहार अर्पण करून आण्णासाहेब मगर यांना अभिवादन केले.
वैशाली काळभोर, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंगेस