पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चालू असलेली अतिक्रमण कारवाई थांबवा
![Pimpri Chinchwad Mahanagarpalikamidhay ongoing asaleli encroachment action Thambwa](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/eknath-shinde-bhet.jpg)
– शिवसेना भोसरी विधानसभा पदाधिकारी यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत अतिक्रमण कारवाई सुरु आहे. नागरिकांचा दोष नसताना त्यांच्यावर होणारी कारवाई अन्यायकारक आहे. त्यामुळे ही कारवाई थांबवा अशी मागणी शिवसेना भोसरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन ही मागणी केली.
या वेळी शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिवसेना पुणे जिल्हा संघटक तुषार सहाणे, युवासेना उप जिल्हा युवा अधिकारी ॲड. कुणाल किसन महाराज तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित लांडगे, शिवसेना विभागप्रमुख योगेश बोराटे आदी या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमुद केले आहे की, कालचा मंत्रिमंडळ निर्णय १५०० स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना कसलीही बांधकाम परवानगीची गरज नाही. त्या बांधकामांना संरक्षण मिळावे. त्याचबरोबर जे बांधकाम रेडझोनच्या सीमेवर आहेत, भविष्यात रेडझोनच्या हद्दीतून बाहेर येऊ शकतील अथवा ज्यांना भविष्यात काही प्रमाणात दंड भरून नियमित केले जाऊ शकतील, अशा बांधकामाविरुद्धची कारवाई थांबवावी, अशी मागणी केली.
या वेळीतात्काळ त्या संदर्भात आयुक्तांशी बोलून संबंधित बाधित नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.