पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 397 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पिंपरी / महाईन्यूज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी 397 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन प्रशासनाने केले असताना देखील अनेकजण मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.
कोरना विषाणू संक्रमणाचा धोका रोखण्यासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सॅनिटायझर जवळ बाळगून सामाजिक सुरक्षा अंतर ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. तरी काही नागरिक विनामास्क फिरताना दिसत आहेत. तोंडाला मास्क न लावता दुचाकीवर डबल सीट, ट्रिपल सिट तरुण फिरत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अनेकजण मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका होण्याची शक्यत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोना विषाणुची साखळी तोडणे कदापी शक्य होणार नाही, त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडविणा-या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत काल दिवसभरात 397 जणांवर कारवाई करण्यात आली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यांतर्गत 95 जणांवर कारवाई झाली. भोसरी 9, पिंपरी 71, चिंचवड 16, निगडी 52 कारवाई झाली. आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांतर्गत एकही कारवाई नाही. दिघी पोलीस ठाण्यांतर्गत 69 जणांवर कारवाई झाली. सांगवी 18, वाकड 48, हिंजवडी 14, देहूरोड 2, तळेगाव दाभाडे 3 अशी कारवाई झाली. म्हाळुंगे चौकी, तळेगाव एमआयडीसी, चिखली, रावेत, शिरगाव चौकी अंतर्गत एकही कारवाई झालेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.