पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या बंदला समिश्र प्रतिसाद
पिंपरी, महाईन्युज, प्रतिनिधी
ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एफआयआर दाखल केल्यानंतर आज पवार मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी स्वतः जाणार होते. याच्या निषेधार्त राज्यभरात राष्ट्रवादीने बंदची हाक दिली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी, नेहरूनगर, भोसरी, संत तुकाराम नगर, कासारवाडी, वाकड, डांगे चौक, काळाखडक, पुनावळे, ताथवडे, कुदळवाडी, चिखली, चिंचवड, निगडी आदी भागात स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. त्यास व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत होता. तर शहराच्या काही भागात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले. तर, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवानेते संदीप पवार, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आपापल्या भागातील व्यापारी, व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.