पिंपरी चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्याचा हैदोस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/1dogs_5.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुले, अबालवृध्द नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कचराकुंडीसह परिसरात रात्र दिवस मोकाट कुत्री फिरुन दहशत निर्माण करीत आहेत. अचानक पहाटे व रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर धावुन जाऊन छोट्यामोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात. याकडे पालिका पशुवैद्यकीय अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.
महापालिका हद्दीतील कचराकुंड्या, छोटेछोटे नाष्ट्याच्या टपऱ्या, मटन, चिकणच्या दुकानदारांनी खरकटे फेकून दिल्याला अन्नावर ताव मारून बळावलेली ही कुत्री पहाटे वा रात्रीच्या वेळेत गल्ली बोळात दबा धरून बसलेली असतात. एखादे वाहण आले की अचानक त्याच्यावर धावत जाऊन जोरदार पणे भुंकून चाल करतात. अचानक कुत्र्याने केलेली चाल पहाता वाहनचालक गडबडतात आणि कित्येकदा गाडीवरून खाली पडल्याने गंभीर अपघातही घडत आहे. तर पहाटे व्यायामाच्या निमित्ताने बाहेर पडणारे काही लोक खासकरून जेष्ठ नागरिक हातात काठी घेऊनच बाहेर पडत आहे. त्यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. भटक्या कुत्र्यांबरोबर पाळीव कुत्रीही डोकेदुखी होऊ पहात आहे. यांचे मालक दरोरोज सकाळ संध्याकाळ यांना मोकळे सोडुन देतात, त्यामुळे आजुबाजुचा परिसर अस्वच्छ करु लागले आहेत.