पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर; अडीच हजाराचा टप्पा ओलांडला!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/COVID-19-500x320-2.png)
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज मोठ्या संख्येने ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला आटोक्यात असलेल्या कोरोनाने आता शहरात उद्रेक सुरू केला असून अडीच हजार बाधित रुग्णांचा टप्पा आज (दि.२७) ओलांडला आहे. शहरातील विविध भागात काल सायंकाळ पासून आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ९५ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने आजपर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या २५०० वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोरोनाच्या वॉररूमधून मिळालेल्या माहतीनुसार शहरात ११ मार्च रोजी पहिला कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर एक-एक करत ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सुरुवातीला काही प्रमाणात हा संसर्ग आटोक्यात आला होता. मात्र कालांतराने हा आजार संपूर्ण शहरात हजेरी लावत आहे. शहरातील विविध भागात गेल्या आठवडाभरापासून या आजाराने शिरकाव केला असून काल संध्याकाळपासून ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २५०० एवढी झाली आहे. तर शहरातील ४३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून एकूण मृतांची संख्या ७० एवढी झाली आहे. सध्या शहरात ९७२ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत तब्बल १४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.