पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचे पाच संशयीत रुग्ण, आजपासून आपत्ती व्यवस्थापन शिष्टाचार लागू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Shravan-Hardikar-PCMC-New-Commissnor-04-1.jpg)
- आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
- भोसरी रुग्णालयात करोना बाधीत रुग्णांसाठी 40 बेडची व्यवस्था
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यात करोना विषाणु आजाराचे ( COVID – 19) रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन शिष्टाचार आजपासून (दि. १०) लागू केला आहे. त्याचे पालन शहरातील सर्व नागरिकांना करावे लागणार आहे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
करोना विषाणू आजाराचे (COVID – 19) अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विषाणुबाबतच्या रुग्णांसाठी १० बेडचा विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. सदर विलगीकरण कक्षात ५ बेड महिलांसाठी तर ५ बेड पुरुषांसाठी राखीव आहेत. २ व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड मनपाच्या नविन भोसरी रुग्णालयाचे इमारतीमध्ये ४० बेडसचे करोनो विलगीकरण शिबिर (Corona Quarantine Camp) तयार करण्यात आलेला आहे.
आयुक्त हर्डीकर म्हणाले की, महापालिकेमधील विविध ७ खाजगी हॉस्पीटलमध्ये एकुण ४८ आयसोलशन बेडसह ०७ व्हेंटिलेटर तयार ठेवले आहेत. वेैद्यकीय विभाग तथा सर्व रुग्णालयांमध्ये करोना विषाणू आजाराविषयी माहिती देणेकरीता अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी व सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी – रुग्णालय यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सद्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये चीन व इतर देशातून आलेल्या प्रवाशांचा १४ दिवस वैद्यकिय विभागामार्फत राज्यशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार पाठपुरावा करण्यात येत आहे.
आतापर्यंत एकुण ३१ प्रवाशांचा पाठपुरावा वैद्यकीय विभागामार्फत केला असून त्यापैकी २० प्रवाशांचे पाठपुराव्याचे १४ दिवस पुर्ण झाले आहेत. वरीलपैकी कोणत्याही प्रवाशाला कोरोना आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच, या व्यतिरीक्त ५ संशयित प्रवाशांना वायसीएम रुग्णालयामधील करोना आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करुन त्यांचे घशातील द्रावाचा नमुना एनआयव्ही, पुणे येथे पाठविला असून अहवाल प्रलंबित आहेत.
करोना या आजाराविषयी मनपाच्या सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांची कार्यशाळा वैद्यकीय विभागामार्फत घेण्यात आलेली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तसेच आयएमए, पीडीडीए, निमा या वैद्यकीय संघटना यांना ६ फेब्रुवारी रोजी ज्या देशात करोना विषाणुचा उद्रेक झाला, अशा देशातून आलेल्या प्रवाशांची माहिती ईमेलव्दारे या कार्यालयास कळविणेकामी पत्र देण्यात आलेले आहे.
पिंपरी-चिंचवड मनपामार्फत खाली नमुद केलेनुसार जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मोठे चौक, प्रभाग कार्यालये, पिंपरी-चिंचवड दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये इत्यादी १६४ ठिकाणी मोठे फ्लेक्स लावले आहेत. १ लाख ५० हजार हस्तपत्रिका वाटप केल्या जात आहेत. ५ हजार स्टिकर्स, ५ हजार पोस्टर्स सर्व खाजगी दवाखाने व रुग्णालये याठिकाणी चिटकविण्यात येत आहेत, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.