पिंपरी-चिंचवडमधील शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/11-7.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे, जिने, रेलिंगचे दिवसांतून चार वेळा नियमित निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या दालनासह बैठकीच्या सभागृहांचीही जंतुनाशक वापरून साफसफाई केली जाणार आहे. तसेच, स्वच्छतागृहामध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हँडवॉश उपलब्ध करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने आता पुण्यातही शिरकाव केला आहे. पुण्यात कोरोना बाधितांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील तीन बाधितांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातही खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
महापालिका मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयातील जिन्यांचे रेलिंग, सर्व अधिकाऱ्यांच्या दालनाचे दरवाजे, दरवाजाची मूठ, सर्व शौचालयांची दिवसांतून चार वेळा जंतुनाशक वापरून साफसफाई करावी; सर्व शौचालयांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हँडवॉश नियमितपणे उपलब्ध ठेवावे, महापालिका सभागृह, स्थायी समिती सभागृह, आयुक्त दालनातील बैठक हॉल आणि अन्य सर्व सभागृहांमध्ये तसेच क्षेत्रीय कार्यालयांमधील सभागृहांमध्ये बैठक सुरू होण्यापूर्वी आणि संपण्यापूर्वी सभागृहांची तसेच टेबल, माइक यांचीही जंतुनाशक वापरून साफसफाई करावी.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/FB_IMG_1584268250288.jpg)
ही निर्जंतुकीकरण कार्यवाही बैठक सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर पूर्ण करावी. महापालिका हद्दीत कोरोना विषाणूची बाधा झालेला अथवा संशयित रुग्ण आढळून आल्यास अशा इमारतीच्या किंवा सोसायटीच्या परिसरात, सभोवताली बेक्टोडेक्सची फवारणी करावी. सार्वजनिक शौचालयांमध्ये, आरोग्य निरीक्षकांच्या कार्यालयातही बेक्टोडेक्सची फवारणी करावी. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या वेळांसह कामकाज पूर्ण झाल्यावर, जेवणापूर्वी व जेवण झाल्यावर प्रत्येक वेळी हात धुण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचना डॉ. रॉय यांनी केल्या आहेत.