पिंपरीत शिवसेनेचे आमदार राम कदमांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’
पिंपरी ( महा ई न्यूज ) – दहीहंडी उत्सवात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व भाजप प्रवक्ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध आज (शुक्रवारी) शिवसेनेने केला. आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला शिवसेनेने जाहीरपणे जोडे मारो आंदोलन केले.
पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनाला महिलांच्या संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, शहर प्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मीनल यादव, नगरसेवक सचिन भोसले, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आशा भालेकर, सुशीला पवार, शशिकला उभे, स्वरुपा खापेकर, अनिता तुतारे, युवराज कोकाटे, वसंत भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
यावेळी ‘राम कदम यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा जोरदार घोषणा राम कदम आणि सरकारच्या विरोधात आंदोलकांनी दिल्या.
भाजप आमदार राम कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात करतात. सेलिब्रिटींची हजेरी त्याला असते. यावेळी, तर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.