पिंपरीच्या महापाैरांना डावलले, महामेट्रो कोचचे वल्लभनगरला उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-19.jpg)
वल्लभनगर येथे व्यवस्थापकीय संचालक डाॅ.ब्रिजेश दीक्षित यांचे फोटोसेशन
मार्चअखेर मेट्रो रुळावरुन धावणार, उर्वरीत काम अंतिम टप्प्यात आले
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पुणे महामेट्रोचे वल्लभनगर येथील स्टेशनवर मेट्रोची चाचणी सुरु करण्यात येणार आहे. त्या मेट्रो कोचचे आज (मंगळवारी) व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या प्रथम नागरिक महापाैर उषा ढोरे यांच्यासह महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांना डावलून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच महामेट्रो प्रकल्पावर पिंपरी-चिंचवडचा नामोल्लेख टाळण्यात आल्याने महापाैरांसह शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे महामेट्रोचे वल्लभनगर येथील स्टेशनवर आज मेट्रोचे वैदिक पध्दतीने मंत्रोच्चारण, पूजन करुन श्रीफळ वाहण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महामेट्रो प्रकल्पाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उद्घाटनास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापाैर उषा ढोरे यांच्यासह खासदार, आमदारांना डावलले आहे. एकाही लोकप्रतिनिधी व पालिका पदाधिका-यांना या कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही.
![](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/20191231_114446-scaled.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे सहा डबे (कोच) मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोची रुळावरुन ट्राॅयल घेण्यास लवकरच सुरुवात होईल. पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत ही चाचणी सुरु राहणार आहे. उर्वरीत काम लवकर पूर्ण करण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरु आहेत.
![](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/20191231_124338-scaled.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महामेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत.
![](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/20191231_114446-1-scaled.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
डाॅ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, पुणे मेट्रो प्रकल्प 31 कि.मी. अंतर व्यापले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मनपाद्वारे दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन लि. प्रवाशी मार्गाची आखणी केली आहे. पुण्याच्या प्रवाशांना सुलभतेने प्रवास करता यावा, याकरिता मेट्रोचा प्रमुख हेतू आहे. मेट्रोच्या जलद आणि सुखकारक प्रवाशासाठी केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर पुणे मेट्रोचे काम हाती घेवून जवळपास 50 लाख प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
![](https://i0.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/20191231_112852-scaled.jpg?fit=1024%2C576&ssl=1)
पिंपरी ते स्वारगेट हा 16.6 किमी अंतर असून 14 स्थानकं आहेत. रेल्वे मार्गात काॅरिडाॅर एक भूयारी आणि रस्त्याच्या वरील भाग अशा दोन्ही रेल्वे मार्गांचा समावेश आहे. पिंपरी ते फुगेवाडी पर्यंत मेट्रो मार्चअखेर रुळावरुन धावणार आहे. तसेच उर्वरीत फुगेवाडी ते स्वारगेट हे देखील काम लवकरच पुर्ण करणार आहोत. असेही ते म्हणाले.