पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे दादांसोबत, कार्यकर्ते साहेबांसोबत !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/images-7-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं बोललं जातय. राष्ट्रवादीचे राज्यभरातील आमदार शरद पवार साहेबांसोबत असल्याचा दावा करत असताना आण्णांच्या भूमिकेने पिंपरीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अन्य आमदार देखील उपस्थित होते. मात्र, त्यांना दादांचा शपथविधी असल्याची तसुभर ही माहिती नव्हती. दादांचा शपथविधी उरकताच हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आले. आम्ही साहेबांसोबत असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांना एकाकी पाडले. असे चित्र राज्यात असताना पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे हे एकमेव आमदार दादांसोबत राहिले आहेत. आण्णांच्या या भूमिकेने पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास डोळ्यासमोर घेत असताना अजित पवार यांना विसरता येत नाही. त्यामुळे दादांवर निष्ठ असणारे ढीगभर कार्यकर्ते शहरात पक्षाचे काम करताना दिसतात. परंतु, त्यांच्यावर शरद पवार यांच्या विचारांची छाप आहे. त्यामुळेच शहरातील अनेकांना दादांची भूमिका आवडलेली नाही. म्हणूनच, मी 80 वर्षांच्या योध्यासोबत असल्याचे फ्लेक्स शहरात झळकत आहेत. असे वातावरण असताना आण्णांनी मात्र, अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. आता ‘दादांना समर्थन द्यायचं, की साहेबांचं ऐकायचं’ या दुहेरी पेचात कार्यकर्ते अडकले आहेत.