पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर नियोजित समांतर पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते करा
![Bhumi Pujan of Pimpri Gaon to Pimple Saudagar planned parallel bridge by Guardian Minister Ajit Pawar:](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/उषा-1.jpg)
नगरसेविका उषा वाघेरे यांनी केली मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पवना नदीवर उभारण्यात येणाऱ्या पिंपरी गाव व पिंपळे सौदागर गावांना जोडणारा समांतर पुलाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करावे, अशी मागणी नगरसेविका उषा संजोग वाघेरे यांनी केली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे हि मागणी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरीगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी कॅम्प भागातील नागरिकांना या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. काही दिवसापासून वर्षापासून पिंपरीगाव व पिंपळे सौदागर परिसराला जोडणाऱ्या पुलाला एक समांतर पूल उभारावा यासाठी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व नगरसेविका उषा वाघेरे यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. या प्रयत्नांना यश म्हणून समांतर पुलाच्या कामाला नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. या पुलामुळे या भागातील हजारो नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात व जडणघडणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराचे विकासपुरुष म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या हस्ते पिंपरी गाव व पिंपळे सौदागर परिसराला जोडणाऱ्या समांतर पुलाचे उदघाटन व्हावे, अशी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांची इच्छा आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी उषा वाघेरे यांनी केली आहे.