पालिकेच्या 8 प्रभाग समिती सभापती पदांवर भाजपच्या या नगरसेवकांना मिळाली संधी
पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे. शर्मिला बाबर (अ प्रभाग), सुरेश भोईर (ब प्रभाग), राजेंद्र लांडगे (क प्रभाग), सागर आंगोळकर (ड प्रभाग), विकास डोळस (इ प्रभाग), कुंदन गायकवाड (फ प्रभाग), बाबासाहेब त्रिभुवन (ग प्रभाग) आणि हर्षल ढोरे (ह प्रभाग) यांची निवड झाली आहे.
महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील मधुकर पवळे सभागृहात प्रभागांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी म्हणून अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रत्येक प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडीवेळी सभा शाखा सचिव म्हणून त्या त्या प्रभागाच्या प्रशासन अधिका-यांनी काम पाहिले. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभागाचे प्रशासन अधिकारी अनुक्रमे सुचिता पानसरे, सोनम देशमुख, दिलीप आढारी, कैलास गावडे, अवधूत तावडे, वामन नेमाणे, श्रीनिवास दांगट आणि श्रीकांत कोळप यांचा समावेश होता.
निवडीवेळी सभागृहात अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासह नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशांत जोशी, अण्णा बोदडे, कैलास गावडे, बाळासाहेब खांडेकर, मनोज लोणकर, स्मिता झगडे आणि संदीप खोत उपस्थित होते. नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींचे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे पक्षनेते नामदेव ढाके तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले.