पालिकेच्या शिक्षण विभागात चुकीचे धडे, आमदारांनी घेतली दखल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात 105 शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठीच्या अटी-शर्तींमधील मागासवर्गीय उमेदवारांसाठीची वयोमर्यादा चुकीची दर्षविल्याने शिक्षण विभागाकडून शासन नियमांचे उल्लंघन झाले असून संबंधित प्रशासन अधिका-यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 106 प्राथमिक शळा आहे. या शाळांमध्ये सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण विभागाने 105 शिक्षकांची भरती काढली आहे. त्यासाठी जाहीरात नुकतीच प्रसिध्द देखील केली आहे. अर्ज करणा-या उमेदवारांसाठीच्या अटी-शर्ती नमूद करताना मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 अशी चुकीची दर्शविली आहे.
ही चूक पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. वास्तवीक शासनाच्या सुधारित अध्यादेशानुसार मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत आहे. मात्र, शिक्षण विभागाने ही मर्यादा 38 वर आणून शासन नियम व आदेशाचा भंग केला आहे. याप्रकरणी सुधारित शुध्दीपत्रक काढून व अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी सूचना आमदार चाबुकस्वार यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात हार्डीकर यांच्यासोबत आमदार चाबुकस्वार यांचा पत्रव्यवहार झाला आहे.