breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘ई-हेल्थकार्ड’ प्रणालीमध्ये अद्यावत सुविधांचा समावेश, नागरिकांना मिळणार घरबसल्या माहिती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ”ई- हेल्थकार्ड” प्रणालीमध्ये रुग्णालयातील अंतररुग्ण विभागांतर्गत उपचार घेणा-या रुग्णांची माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. ती माहिती महापालिकेच्या ”डॅशबोर्ड” सुविधेद्वारे रुग्णांना घरबसल्या पहायला मिळणार आहे. या सुविधेद्वारे रुग्णांना उपचार घेण्यासाठी किंवा पुनर्तपासणीसाठी रुग्णालयात येण्याकरिता ”ई-मेल”द्वारे अथवा मोबाईल ”एसएमएस”द्वारे माहिती अवगत करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून देशवासियांकरीता “नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन” हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. हा प्रकल्प केंद्रशासनाचा “राष्ट्रीय डिजिटल हेल्थ” प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य विषयक डेटाबेस तयार होणार असून त्याचा उपयोग करून माहितीचे पृथ्थकरण करणे सोईस्कर होणार आहे. त्याचा उपयोग करून वैद्यकीय क्षेत्रास विविध संशोधण करणे शक्य होणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात सन 2011 रोजी मे. अमृता टेक्नॉलॉजीज् यांच्या सहकार्याने तत्कालीन महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी वायसीएम रूग्णालयामध्ये येणा-या नागरिकांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन व्हावी, या दृष्टीने “ई- हेल्थकार्ड” प्रणालीचा अवलंब केला. ही प्रणाली आजअखेर यशस्वीरित्या कार्यान्वित आहे. या प्रणालीची उपयोगिता व आवश्यकता याचा विचार करून महापालिकेस प्राप्त झालेल्या आजपर्यंतच्या सर्वच आयुक्तांनी सदर प्रणाली कार्यान्वित राहील याबाबत दक्षता घेतलेली आहे.

या प्रणालीद्वारे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातीलच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून उपचारासाठी येणा-या बाह्य रूग्णांचे रेकॉर्ड हे “ई- हेल्थकार्ड” प्रणालीद्वारे डिजिटल स्वरूपात जतन करणेत आलेले आहे. वायसीएम रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागामध्ये उपचारासाठी येणा-या रूग्णांना केस पेपर ऐवजी महापालिकेमार्फत हेल्थकार्ड उपलब्ध करून देणेत येत असून रूग्ण उपचारांकरीता वैद्यकीय अधिका-यांकडे गेल्यानंतर त्याच्या आजाराविषयीची सर्व माहिती हेल्थकार्ड प्रणालीमध्ये समाविष्ठ करणेत येते.

तसेच, डॉक्टरांनी दिलेली औषधे इत्यादी बाबतची माहिती देखील प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्यात येते. यामध्ये रक्ताचे अहवाल, एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी. स्कँन, एम.आर.आय. इत्यादी बाबींचा समावेश आहे. लॅबोरेटरी व विविध रेडिओलॉजी उपकरणांसोबत “ई- हेल्थकार्ड” प्रणालीचे इंटिग्रेशन करणेत आलेले आहे. त्यामुळे रूग्णांचे तपासणीचे अचुक अहवाल प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिका-यांना तात्काळ प्राप्त होतात. त्यामुळे अचुक निदान व तत्काळ वैद्यकीय उपचार करणे सोपे झाले आहे.

सद्यस्थितीत अमृता टेक्नॉलॉजीजच्या समन्वयाने रूग्णालयातील अंतरूग्ण विभागाअंतर्गत उपचार घेणा-या रूग्णांची माहिती “ई- हेल्थकार्ड” प्रणालीमध्ये समाविष्ठ करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे संबंधित रूग्णांना डॅशबोर्ड सुविधेद्वारे त्यांची आरोग्य विषयक माहिती घरबसल्या कधीही पाहता येणार आहे. संबंधित रूग्णांना रूग्णालयामध्ये उपचारासाठी अथवा पुनर्तपासणीसाठी येण्याकरीता ई-मेलद्वारे अथवा एसएमएसद्वारे अवगत करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.

सध्या वायसीएम रूग्णालयामध्ये बाह्यरूग्ण विभागामध्ये येणा-या रूग्णांची डिजिलट स्वरूपात माहिती महापालिकेकडे उपलब्ध झालेली आहे. या माहितीचा उपयोग महापालिकेस वैद्यकीय विषयक विविध योजना राबविणेसाठी होत आहे. ही “ई- हेल्थकार्ड” प्रणाली वायसीएम रूग्णालयाबरोबरच टप्प्या टप्याने मनपाच्या इतर रूग्णालयांमध्ये
राबविणेबाबत महापालिकेचा विचार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button