पार्थला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभेची उमेदवारी पार्थ पावार यांना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी मावळ मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. आज दिवसभर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या घरी भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
उद्या पार्थ पवार यांच्या मावळ प्रचाराची सुरूवात पिंपरी-चिंचवडमधून होणार आहे. वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने अजित पवार यांनी आज दिवसभर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधून सभेची जबाबदारी काही मातब्बर पदाधिका-यांवर सोपविली. जास्तीत जास्त लोकांची सभेला उपस्थिती लाभण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पदाधिका-याला लोकांना घेऊन येण्याचे टार्गेट दिले आहे.
मित्र पक्ष कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची देखील पवार यांनी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून आगामी प्रचार यंत्रणेबाबत त्यांचे मत जाणून घेतले. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लोकसभेसाठी पाठिंबा दर्शविला असतानाच अजित पवार यांनी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सक्रीय सहभाग पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी किती महत्वाचा ठरणार आहे, याची जाणिव त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. तसेच, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयाला देखील त्यांनी भेट दिली. शेकापचे शहराध्यक्ष नितीन बनसोडे यांच्यासह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महिला शहराध्यक्षा देखील उपस्थित होत्या.