breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी पुरवठ्यांच्या 21 निविदेतील कामात होतेय रिंग; आयुक्तांचे दुर्लक्ष

मर्जीतील ठेकेदारासाठी दोन वेळा टेंडर केले ‘रद्द’, बदल्या अटी-शर्थी

चार प्रभागांसाठी 21 परिचलन व दुरुस्तीची कोट्यावधीची काढली कामे

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चार प्रभागासाठी 21 परिचलन आणि दुरुस्तीची निविदा राबविण्यात आल्या आहेत. त्या कामात आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळावीत, याकरिता वरिष्ठ अधिका-यांने दोन वेळा टेंडर रद्द करुन त्या कामाच्या अर्टी-शर्थी देखील बदलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सदरील निविदा प्रक्रियेत रिंग होत असून एकाच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविली जात आहे. दरम्यान, महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या काळात राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या नातेवाईकास सर्वाधिक कामे मिळवून देण्यासाठी संबंधित पाणी अधिका-याचा आटापिटा दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा मुख्यालयातून ई निविदा सूचना क्रमांक 4/22/2020-21 शहरातील ब, ड, ह आणि ग प्रभागानूसार दुरुस्ती व परिचलन कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. त्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी एकत्र येवून प्रत्येकाला एक काम मिळावे, याकरिता हालचाली सुरु आहेत.

यापुर्वी पाणी पुरवठा विभागात 2 जानेवारी 2020 रोजी प्रभागांनुसार पाणी पुरवठा दुरुस्ती व परिचलन कामाची निविदा (निविदा क्र. पाणी पुरवठा/मुख्यालय/12/21/2019-20) काढण्यात आली होती. खरे तर त्या दुरुस्ती व परिचलनचे काम वेगवेगळे काढण्याची गरज होती. परंतू, दुरुस्ती करणार्‍या ठेकेदाराकडे मजूर, कामगार पुरवठा करण्याचा परवाना नसतो. तर मजूर, कामगार पुरविणार्‍या ठेकेदाराकडे दुरुस्तीच्या कामाचा परवाना नसतो. असे दोन्ही परवाने असणारे पिंपरीतील एकच ठेकेदार आहे. त्या ठेकेदारासाठी संबंधित अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून निविदा काढताना त्यांना हव्या असणार्‍या अटी-शर्ती टाकून सहकार्य करत आहे. यापुर्वी या कामासाठी अनेक ठेकेदारांनी निविदा भरल्याने स्पर्धा होणार असल्याने अधिकार्‍यांनी एक निविदा पाकीट उघडलेले असताना निविदा परस्पर रद्द केली.

तसेच या कामाची दुसरी निविदा 9 जून 2020 रोजी काढण्यात आली. या निविदेत दुरुस्ती व परिचलन कामे वेगवेगळी काढली होती. परंतु; ही निविदाही अधिकार्‍यांनी शेवटची मुदत असलेल्या दिवशी परस्पर मुदतवाढ देवून 27 जूनपर्यंत निविदा मागविण्यात आली. मात्र, दुसरी निविदाही रद्द करण्यात आली आहे. २२ जुलै रोजी या कामाची तिसरी निविदा (निविदा नोटीस क्र. पाणी पुरवठा/मुख्यालय/4/22/2020-21) काढण्यात आली. ही निविदा पुन्हा पहिल्यांदा म्हणजेच 2 जानेवारी रोजी काढलेल्या ठराविक मर्जीतील ठेकेदारांना फायदा होणार्‍या व रिंग करणार्‍या अटी-शर्तीनुसारच काढण्यात आली.

दरम्यान, पाणी पुरवठ्याच्या संबंधित अधिकार्‍यांने पाणी पुरवठा दुरुस्ती व परिचलन या कामाची पहिल्यांदा व दुसर्‍यांदा निविदा रद्द केली. त्यानंतर पिंपरीतील एका ठेकेदारासाठी तिस-यांदा निविदा काढून त्यांच्याच मर्जीनूसार अर्टी-शर्थी टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कामात रिंग होत असून ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button