पाणीपूरवठा विभागात ठेकेदाराची ‘दादागिरी’, वरिष्ठ अधिका-यासमोर फेकल्या फाईल्स?
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारांवर '420' चा गुन्हा दाखल होणार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-14.jpg)
स्पर्धकांना अपात्र ठरवा, मलाच कामे मिळाली पाहिजेत, अधिका-यांसह कर्मचा-यांना भरला दम
परिचलन व दुरुस्तींच्या निविदा भरलेल्या काही ठेकेदारांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून चार प्रभागातील 21 परिचलन व दुरुस्तीची निविदा राबविण्यात आलेली आहे. त्या निविदेतील प्राप्त ठेकेदारांनी भरलेल्या कामानूसार त्यांना पात्र-अपात्र करण्याचे काम सुरु आहे. मात्र, पाणी पुरवठात वर्षांनूवर्ष काम करणा-या एका ठेकेदाराने मलाच कामे मिळाली पाहिजेत, स्पर्धकांना कागदपत्र छाननीत अपात्र ठरवा, अशी दमबाजी करत वरिष्ठ अधिका-यांसमोर निविदेच्या फाईल्स फेकून देत मोबाईल देखील फोडल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. तसेच टेंडर लिपिकांना देखील दमदाटी करण्यात आली असून वरिष्ठ अधिका-यांच्या अर्थपुर्ण वाटाघाटीमुळे परिचलन व दुरुस्तींच्या कामात रिंग करण्यात येवू लागली आहे. याबाबत निविदा भरलेल्या काही ठेकेदारांनी या वृत्ताला दुजाेरा दिला असून पाणी पुरवठा विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने चार प्रभागासाठी 21 परिचलन आणि दुरुस्तीची निविदा राबविण्यात आल्या आहेत. त्या कामात आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळावीत, याकरिता वरिष्ठ अधिका-यांने दोन वेळा टेंडर रद्द करुन त्या कामाच्या अर्टी-शर्थी देखील बदलण्यात आल्या आहेत. त्या निविदा प्रक्रियेत रिंग होत असून एकाच ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत कोणतीही पारदर्शकता दिसून येत नाही.
पाणी पुरवठा मुख्यालयातून ई निविदा सूचना क्रमांक 4/22/2020-21 शहरातील ब, ड, ह आणि ग प्रभागानूसार दुरुस्ती व परिचलन कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी एकत्र येवून प्रत्येकाला एक काम मिळावे, याकरिता हालचाली सुरु आहेत. पाणी पुरवठ्याच्या संबंधित अधिकार्यांने पाणी पुरवठा दुरुस्ती व परिचलन या कामाची पहिल्यांदा व दुसर्यांदा निविदा रद्द केली. त्यानंतर पिंपरीतील एका ठेकेदारासाठी तिस-यांदा निविदा काढून त्यांच्याच मर्जीनूसार अर्टी-शर्थी टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कामात रिंग होत असून ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा राबविण्यात आलेली आहे.
दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या केबिनमध्ये त्या मर्जीतील ठेकेदाराने आदळ-आपट केलीय, त्या ठेकेदाराने अधिका-यांसमोर निविदा प्रक्रिया राबविलेल्या फाईल्स फेकून दिल्या. स्पर्धेक आलेल्यांना ठेकेदारांना अपात्र करा, मी निविदा भरलेल्या ठिकाणी एकालाही काम द्यायचे नाही. अशा प्रकारे दमदाटी करुन टेंडर लिपिकांना आरेरावीची भाषा वापरण्यात आली आहे. याशिवाय मोबाईल देखील जमिनीवर आपटून अधिकारी-कर्मचा-यांवर राग व्यक्त केला आहे. याविषयी पाणी पुरवठा विभागात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे म्हणाले की, माझ्या कार्यालयात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. माझ्या कर्मचा-यांना देखील कोणी दमदाटी केलेली नाही. याविषयी टेंडर लिपिक सुनिल शिंदे आणि आडे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.