पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/16052018_sciencePark_08.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दिवाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रियाशील वैज्ञानिक प्रयोगांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन सुट्टीचा काळ सुध्दा ज्ञान संपादनासाठी उपयोगात आणावा, यासाठी सायन्स पार्क व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
विज्ञान प्रयोगांची कार्यशाळा 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या कार्यकाळात सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके शिकविली जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना तीन तुकड्यांमध्ये समाविष्ठ केले आहे. प्रत्येक तुकडीला दोन दिवस कार्यशाळेत शिकता येणार आहे. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक साधन सामग्रीशिवाय कमीत-कमी खर्चात सहज बनविता येतील, अशा वैज्ञानिक सिध्दांतावर अधारित गंमतीदार प्रयोग संच तयार करता येणार आहेत. त्याची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.
कार्यशाळेत क्रियाशील विज्ञान व खगोलशास्त्र या विषयांमधील तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना सायन्स पार्कमधील विज्ञान प्रदर्शने, तारामंडल, 3डी शो, विज्ञान प्रश्न मंजुषा तसेच दुरबिनीद्वारे आकाशाची ओळख करून दिली जाणार आहे.