पवनाथडी जत्रेत ग्राहकांची मांदीयाळी, आर्थिक उलाढालीत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/DSCN2063.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेल्या तीन दिवसात पवनाथडी जत्रेमध्ये सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांनी आवरजून पवनाथडी जत्रेला भेट दिली. पवनाथडीचे व्यवस्थापन आणि बचत गटांच्या महिला व्यवसायिकांबरोबरच ग्राहकांना दिल्या जाणा-या सुविधांची त्यांनी पाहणी केली.
महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी ४ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. सुमारे ८१३ बचत गटांनी आपले स्टॉल्स उभारले असून त्यामध्ये शाकाहारीचे पदार्थांचे २४७ व मांसाहारी पदार्थांचे २०५ तर इतर ३६१ स्टॉल्सचा समावेश आहे. ४ जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची एक लाख एकतीस हजार आठशे रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपयांची आणि इतर एक लाख अष्ठ्याहत्तर चारशे सहासस्ठ रुपयांची उलाढाल झाली. ५ जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची 11 लाख 76 हजार 342 रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची 14 लाख 500 रुपयांची आणि इतर 9 लाख 37 हजार 200 रुपयांची उलाढाल झाली. ६ जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची 5 लाख पंधरा हजार शंभर रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची बावीस लाख सातशे रुपयांची आणि इतर दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपयांची उलाढाल झाली.
पवनाथडी जत्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विविध कलाकारांनी व बालचमूंनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लावण्य दरबार या कार्यक्रमात महिला कलाकारांनी आपली लोककला सादर केली. हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल असा त्रिवेणी संगीताच्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी झाली होती.