पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचा, अण्णा हजारेंचा भाजप सरकारला इशारा
अहमदनगर – 9 फेब्रुवारीपर्यत भाजप सरकारने लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिला. कायदा होऊन 5 वर्षे झाली तरी सरकार लोकपाल नेमायला तयार नाही. लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
लोकपाल आणि लोकायुक्त नेमणुकीच्या संदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तुम्ही आश्वासन देऊन चालणार नाही अशी भूमिका अण्णा हजारेंनी घेतली आहे. लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
केंद्रात लोकपालचा निर्णय घ्या
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसेच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.