पंतप्रधान मोदींच्या सभा नियोजनावरून शहर भाजपात वादाची ठिणगी, पालकमंत्र्यांची उडाली भंबेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-1-1.jpg)
- भाजपातील नव्या-जुन्यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर
- बैठकीतच नगरसेवकांनी आमदारांना विचारला जाब
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंगळवारी (दि. 18) बालेवाडीत आगमण होत आहे. मात्र, हा विकास कामाचा कार्यक्रम नसून भाजपचे शक्तीप्रदर्शन असल्याचा अविर्भाव भाजपच्या नेत्यांनी निर्माण केला आहे. मोदींच्या सभेच्या नियोजनाची जोखीम स्थानिक खासदार, आमदारांच्या कोअर कमिटीवर आहे. प्रत्येक प्रभागातून एक हजार लोकांची फौज सभेला उपस्थित ठेवण्याचे टार्गेट स्थानिक नगरसेवकांना देण्यात आले आहे. मात्र, नियोजनावरून भाजपच्या नव्या फळीतील नगरसेवक आणि कोअर कमिटीत वादाची ठिणगी पडली आहे. एक हजार लोकं फक्त आम्हीच आणायची काय?, कोअर कमिटी किती लोकांना घेऊन येणार आहे?, अशा शब्दांत नगरसेवकांनी व्यासपीठावरील आमदारांना विचारल्याने चालू बैठकीत वाद झाला. या वादामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांची भंबेरी उडाली. त्यांना कोणाचीच बाजु घेता आली नसल्यामुळे त्यांनी मौन बाळगले.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नुकत्याच पाच राज्यांतील विधानसभेच्या निकालाने भाजपच्या स्थानिक खासदार, आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची धास्ती घेऊन त्यांनी मेट्रोच्या भूमीपूजनाचे निमित्त साधून शहरात शक्तीप्रदर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी बालेवाडीतील स्टेडियममध्ये मोदींची सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाचे कामकाज कोअर कमिटीला दिले आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. 15) चिंचवड येथील एका महाविद्यालयाच्या सभागृहात नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचे स्वरूप उलघडून सांगितले. या बैठकीला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. तर, सुमारे चाळीस नगरसेवक उपस्थित होते. त्यांना प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातून 1000 लोकांना सभेसाठी घेऊन यायचे टार्गेट दिले, अशी खात्रीशीर माहिती आहे.
मात्र, हे टार्गेट देताना खाली बसलेल्या नगरसेवकांनी प्रत्येक वेळी “आम्हीच लोकांना घेऊन यायचे काय, कोअर कमिटीतील पदाधिकारी किती लोकांना घेऊन येणार, तेही सांगून टाका एकदाचे”, असे संतापजनक विधान केल्याने भाजपच्या या बैठकीत वादाची ठिणगी पडली. जुन्या आणि नव्या गटांतील नगरसेवकांत असंतोष असतानाच आता मोदींच्या सभा नियोजनावरून पक्षाला गालबोट लागले आहे. दरम्यान, कोअर कमिटी आणि नगरसेवकांत वादावादी सुरू असताना पालकमंत्री गिरीश बापट यांची मात्र, भंबेरी उडाली. त्यांना कोणाचीच बाजू घेता येत नसल्यामुळे त्यांनी शांत राहणेच पसंत केले. या वादावरून भाजपचे तुकडे पडत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
खासदार साबळेंची बैठकीला दांडी
भाजपच्या कोअर कमिटीमध्ये शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, अॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, उमा खापरे अशा प्रमुख लोकांचा सामावेश आहे. मात्र, या बैठकीला खासदार साबळे उपस्थित राहिले नाहीत. साबळे यांना मोदींच्या सभेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
शहर प्रवक्ता थोरातांचे खोटे विधान
आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेकांचा विरोध पत्करून अमोल थोरात यांना भाजपचे शहर प्रवक्ता पद दिले. एवढे मोलाचे पद असताना पक्षासंबंधीत इत्यंभूत माहिती देण्याच्या जबाबदारीचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. मोदींच्या बैठकीसंदर्भात विचारले असता नगरसेवकांना कसलेही टार्गेट दिलेले नसून ‘ज्यांचे मोदींवर प्रेम आहे, ते सभेला आपोआप येतील’, असे उत्तर त्यांनी माध्यमाला दिले आहे. वास्तवात नियोजनाची पूर्ण तयारी झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यांचे विधान खोटे ठरत आहे.