पंतप्रधान आवास योजनेच्या अर्जांची सोडत त्वरित घ्या
![Quickly drop the Prime Minister's Housing Scheme applications](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/यादव.jpg)
महापालिका स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी अर्ज केलेले आहेत. मात्र अर्जांची सोडत कधी होणार आहे? याबाबत नागरिक विचारणा करत आहेत. त्यामुळे लाभार्थी सोडत त्वरित घ्या, अशी मागणी महापालिका स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. झोपडपट्टी निर्मूलन तथा पुनर्वसनचे सहायक आयुक्त राजेश आगळे यांना निवेदनाद्वारे हि मागणी केली.
निवेदनात नमूद केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महापालिका घरकुल योजना राबविणार आहे. त्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे सहाय्य असणार आहे. महापालिकेने दोनदा अर्ज मागविले होते. त्यानंतर सुमारे पन्नास हजार नागरिकांनी मोठ्या अपेक्षा ठेऊन घरांसाठी अर्ज सादर केले. त्यासोबत पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट घेण्यात आला आहे. अर्ज सादर करण्याची मुदत संपून जाऊन बराच काळ उलटून गेला. पुणे महापालिका घरकुल योजनेची सोडत मागील काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती. त्यांनतर त्यांनी लाभार्थी असलेल्या नागरिकांची नावे सार्वजनिक केली होती. पिंपरी चिंचवड महापालिकाकडून याबाबत काहीही माहिती देण्यात आली नसल्याने नागरिक हे नगरसेवक आणि महापालिका पदाधिकारी यांना विचारणा करत आहेत.
याबाबत दिनेश यादव यांनी महापालिका सहायक आयुक्त यांची भेट घेऊन घरकुल योजनेबाबत चर्चा केली. लवकरात लवकर लाभार्थी सोडत घेण्याची मागणी केली. प्रत्यक्ष घरे तयार होऊन मिळायला अजुन किती कालावधी लागणार? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. शहरात स्थायीक झालेल्या अनेक नागरिकांना आपल्या हक्काच्या छताची अपेक्षा आहे. घरकुलच्या माध्यमातून आपले ते स्वप्न साकार होईल, या आशेवर अनेक नागरिक विसंबून बसलेले आहेत. त्यामुळे महापालिकेने दिरंगाई न करता या योजनेला गती द्यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.