पंतप्रधानांची डेडलाइन, डिसेंबरपर्यंत पिंपरी ते रेंजहिल्स मेट्रो धावणार?
- आता मेट्रोची 45 टक्के काम पुर्ण
- उर्वरित 55 टक्के काम करण्यासाठी सात महिन्याची डेडलाइन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गावर येत्या डिसेंबरअखेर मेट्रो धावेल, असा दावा ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या एलिव्हेटेड मेट्रोचे काम सुमारे ४५ टक्के पूर्ण झाले आहे. उरलेले काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘महामेट्रो’चे प्रकल्प प्रमुख प्रशांत कुलकर्णी आणि गौतम बिराडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी दिलेली डेडलाइन पूर्ण करण्याचा ‘महामेट्रो’चा प्रयत्न आहे. मेट्रोचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्या वेळी त्यांनी २०१९ चे टार्गेट दिले होते. मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून, त्यांनी सुरू केलेल्या कामांचा ते निश्चितच आढावा घेतील. त्यामुळे ते ध्येय साधण्यासाठी जलदगतीने हे काम पूर्ण करून, येत्या डिसेंबर पर्यंत गरवारे महाविद्यालयापर्यंत तरी मेट्रो आणण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मेट्रोच्या डब्यांसाठीच्या निविदा लवकरच निघतील असेही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. दोन्ही मार्गातील फाउंडेशन, पिलर, पिलर कॅब, सेगमेंट, कास्टिंग, स्पॅन लाँचिंग ही कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत.
.