नियमबाह्य स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अपघाताला निमंत्रण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/18622476_1870953463179692_6720140851445874370_n.jpg)
- सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांची खंत
पिंपरी – वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यातच वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी शहरांतर्गत वेगवेगळ्या भागांमध्ये स्पीड ब्रेकर तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग नियंत्रणात येण्याऐवजी अपघाचे प्रमाण वाढले आहे. मुळात स्पीड ब्रेकरच अपघाताला निमंत्रण देत असल्याची खंत पिंपळे सौदागर येथील बांधकाम व्यवसायिक संदीप काटे यांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असल्यामुळे कामाच्या निमित्ताने शहरात येणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्याकरिता रस्ते किंवा पायाभूत सुविधांची कामे करत असताना विशेषतः स्पीड ब्रेकर नियमानुसार तयार करण्याची गरज आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्पीड ब्रेकर बांधण्यात येत आहेत. मात्र, त्यामागे शास्त्रशुद्ध विचार किती केला आहे. हाच प्रश्न या कामांमधून समोर येत आहे. शहरामध्ये एकाच रस्त्यावर थोड्या-थोड्या अंतरावर बांधण्यात आलेल्या स्पीडब्रेकरचा आकार, उंची वेगवेगळ्या कशा ? काही स्पीडब्रेकर एकदम उंच आहेत,काहींची रुंदी जास्त आहे. काही ठिकाणी स्पीडब्रेकर रस्त्यावर आहेत, की नाहीत, असाच प्रश्न पडत आहे. एकदम उंचीच्या स्पीडब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर वाहनचालकाला नियंत्रण ठेवणे एकदम अवघड जाते. त्याचा वेग जास्त असेल, तर त्याच्या मागे बसलेली व्यक्ती पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही काटे यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी बांधलेल्या स्पीडब्रेकरच्या मधून किंवा रस्त्याच्या कोपऱ्यातून दुचाकी नेण्यापुरते फोडकाम केलेलेही दिसून येते. त्यामुळे, या स्पीडब्रेकरचा हेतूच वाया जातो. वाहनांची गती कमी करण्याऐवजी, या मोकळ्या जागांमधून गाडी नेऊन वाहनचालक सुसाटच राहतात. याच पद्धतीच्या कामामध्ये नव्या स्पीडब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्या ओढण्याचे कामही काही ठिकाणी केलेले नाही. त्यामुळे, वाहनचालकांना एकदम जवळ गेल्यानंतरच स्पीडब्रेकरचा अंदाज येतो. साहजिकच, त्यातून वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघाताला निमंत्रण मिळते. प्रत्येक रस्त्यावर दररोज अशा काही घटना घडत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एखाद्या कुटुंबाला किती मोठी किंमत मोजावी लागेल, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही काटे म्हणाले.