निगडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/smartcity.jpeg)
दरमहा स्मार्ट सिटी संचालक कामांचा आढावा घेणार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या निगडी येथील आस्तित्व मॉलमधील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटर, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील एबीडी एरीया या ठिकाणांच्या कामांची आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक व अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसेचे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हार्डीकर, अतिरिक्त आयुक्त (३) प्रविण तुपे, जनरल मॅनेजर अशोक भालकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता मनोज शेटीया, रविंद्र पवार आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लि. अंतर्गत निगडी येथील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटरमध्ये सीसीटीव्ही, वॉटर मीटर, व्हीएमडी डिस्प्ले, ट्राफीक सिग्नल, पर्यावरण सेन्सॉर, जलनिसा:रण, घनकचरा व्यवस्थापन या विभागांची संपुर्ण माहिती मिळण्यासाठी स्मार्ट नियंत्रण कार्यपद्धती सुरु होणार आहे. हे काम डिसेंबर २०२० पुर्ण करुन महापालिकेकडे हस्तांतरीत करावे. तसेच एबीडी एरीया अंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या ठिकाणी स्मार्ट रस्ते, खेळांची मैदाने, स्मार्ट गार्डन, टॉयलेट, पादचारी मार्ग आधुनिक करणे आदी कामांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
या कामांची पाहणी करण्यात आली. दरमहा स्मार्ट सिटी संचालक या कामांचा आढावा घेणार आहे. हे संपुर्ण कामे जलदगतीने पुर्ण होवुन ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत, या संदर्भातील सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे व संचालकांनी आयुक्त, अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.