Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
निगडीतील धोकादायक वृक्षांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात, छाटणी करा- सचिन चिखले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190729-WA0008.jpg)
- निगडीतील ग्रीन झाडे कोसळण्याच्या स्थितीत
- दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार, चिखले यांचा सवाल
पिंपरी, (महाईन्यूज) – शहरात काल झालेल्या मुसळधार पावसात निगडी परिसरात मुख्य रस्त्यावर एक झाड पडले. झाडपडीच्या घटनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे निगडी परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. १३ निगडी, यमुनानगरमधील महाराणा प्रताप पुतळा ते दुर्गानगर चौकापर्यंत ४० ते ४५ वर्षांपूर्वी ग्रीन-ट्रीची झाडे लावण्यात आली. सद्य स्थितीत ही झाडे अत्यंत मोठी झाली आहेत. झाडांच्या बुंद्याच्या शेजारी महापालिकेकडून अमृत योजनेअंतर्गत मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. त्यासाठी खोदण्यात आलेल्या चरीमुळे झाडांच्या मुळ्या मोठ्या प्रमाणात तुटल्या गेल्या आहेत. झाडे अक्षरक्ष: एका बाजुने वाकली आहेत. काल शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने निगडी परिसरात एक मोठे ग्रीन-ट्रीचे झाड पहाटे साडेपाचच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध कोसळले.
झाडपडीच्या या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली झाडे शक्य तितक्या लवकर बाजुला करत वाहतूक सुरळीत करून दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. निगडी परिसरात अशी अनेक झाडे आहेत, ते सद्यपरिस्थितीमध्ये कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तरी आपण लवकरात लवकरात सदरील झाडांची पाहणी करावी. त्याकामी समिती नेमावी, सर्व धोकादायक झाडे १५ फुटांपर्यंत छाटावीत, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.