निगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/IMG_20181213_133234.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडी येथील दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे व मानवतेच्या दृष्टिकोनातुन त्यांची दुसऱ्या ठिकाणी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात किशोर हातागळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे त्यात असे नमुद करण्यात आले आहे की, “निगडी येथील दिवंगत महापौर कै.मधुकरराव पवळे उड्डाणपुल हा निगडी टिळक चौकातील महत्वाचा केंद्रबिंदु असुन येथे शेजारीच निगडी बसस्थानक आहे येथून पुणे शहरात तसेच निगडी ते भोसरी मार्गे आळंदी अशा वाहतुक सेवा चालतात. तसेच निगडी- मुंबई महामार्ग असल्यामुळे येथे खुप मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, याच चौकातुन प्राधिकरण- रावेत आणि भोसरी एम.आय.डी.सी आणि तळवडे आय.टी पार्क कडे जाण्याचा मार्ग आहे, निगडी हे बसस्थानकाचे प्रथम स्थान असल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिक येथे येत असतात. शेजारीच फ क्षेत्रीय कार्यालय, आणि संत तुकाराम व्यापारी संकुल, कोहिनूर आर्केड, एम.जी चेंबर्स असे शासकीय व निमशासकीय कमर्शियल मॉल येथे आहेत यामुळे हजारो नागरिक या भागातुन येजा करतात, शेजारी यमुनानगर, प्राधिकरण निगडी सारखा स्वच्छ व सुंदर भाग असताना मुख्य रस्त्यावरच या शेकडो भिक्षुकांनी ताबा मारला आहे, उघड्यावरच संसार मांडला असुन शहरवासीयांना तेथुन जाताना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. मुख्य रस्त्याच्या पदपथावर शेकडो भिक्षुकांनी कुटुंबासह ताबा घेतला असुन दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे, उघड्यावरच त्यांनी संसार मांडला असुन स्वच्छतेला व निगडीच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे त्यामुळे तात्काळ या भिक्षुकांना हटविण्यात यावे.