नाले सफाईसाठी 31 मे अखेरची डेडलाईन
सरासरी 75 टक्के साफसफाई पुर्ण झाल्याचा दावा
पिंपरी – शहरातील छोटे व मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी आरोग्य विभागाने यंदा कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता सुमारे 75 टक्के नाले सफाई पुर्ण केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, आयुक्तांनी शहरातील नाले साफसफाई कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात (सीएसआर) फंडातून विविध बांधकाम व्यावसायिक, कंपन्याच्या आणि आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांच्या मदतीने शहरातील 135 छोटे नाल्यांची 75 टक्के स्वच्छता पुर्ण झाली आहे. परंतु, काही मोठे नाल्याची सफाई अजुनही अपुर्ण राहिली आहे. त्यामुळे यंदा नाले सफाईची मदार “सीएसआर’ फंडावर अवलंबून राहिल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याचा निर्धार केला आहे. आरोग्य विभागातील ठेकेदारांना न पोसता सीएसआरच्या माध्यमांतून नाले सफाई करण्यात आली. यामुळेच शहरातील 135 छोटे तर 57 मोठे नाल्यांची पावसाळी पूर्व साफसफाई करण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबविली गेली नाही. शहरातील पावसाळी पुर्व नाल्यांची साफसफाई 15 मे अखेर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने आठ क्षेत्रीय कार्यालयामधून नाले साफसफाई राबविण्यात आली. यासाठी आयुक्तांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या नाल्याची साफसफाई करण्यास सांगून बांधकाम, स्थापत्य विभागाला मदत करण्याची सुचना केली. यानुसार अनेक बांधकाम व्यावसायिक, काही कंपनीचे मालकांनी पोकलेन, जेसीबी यंत्रसामुग्रीसह कर्मचारी देवून नाले सफाईची कामे पुर्ण करण्यात आली आहेत.
दरम्यान, शहरातील “अ’ प्रभागात 25 नाल्यांची 85 टक्के सफाई पुर्ण झाली आहे. “ब’ प्रभागात 19 नाल्याची 60 टक्के सफाई पुर्ण झाली आहे. “क’ प्रभागात 33 नाल्याची 60 टक्के सफाई पुर्ण झाली आहे. “ड’ प्रभागात 15 नाल्याची 85 टक्के सफाई पुर्ण झाली आहे. “इ’ प्रभागात 20 नाल्याची 90 टक्के सफाई पुर्ण झाली. एमआयडीसीचे 5 मोठे नाल्याची सफाई अद्याप झालेली नाही. तर “फ’ प्रभागात 29 नाल्याची 65 टक्के सफाई पुर्ण झालेली आहे, ग प्रभागात 10 नाल्यांची 80 टक्के नाले सफाई झाली आहे. तर ह प्रभागात 29 नाल्यांची 75 टक्के काम पुर्ण झाली आहे, अशी माहिती आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांनी दिली.