भाजपात नाराजी: आगामी महापालिका निवडणुकीला एकोप्याने सामोरे जाऊ !
भाजपा पिंपरी चिंचवड़ प्रभारी माधुरी मिसाळ यांचे आवाहन
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत बैठक
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड़ महापालिका निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली आहे. या निवडणुकीला एकोप्याने सामोरे जाऊन सत्ता मिळविण्याचे आवाहन भाजप पिंपरी चिंचवड़ प्रभारी माधुरी मिसाळ यांनी भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना केले. तसेच मागील चार वर्षात भाजपच्या अनेक नगरसेवकांना एकही पद मिळाले नाही. त्यांना सत्ता आल्यानंतर पद देण्याचे संकेत यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आठ ते नऊ महिन्यांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रभारी माधुरी मिसाळ यांनी पिंपरीतील भाजप नगरसेवक यांच्याशी वन-टू वन संवाद साधला.
मिसाळ म्हणाल्या की, आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांनी सक्रीय व्हावे. लोकांमध्ये संपर्क वाढविण्याच्या सुचना या वेळी मिसाळ यांनी दिल्या. येणा-या काळात हेवेदावे सोडून एकत्रित काम करा. आगामी निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यानी केले. तसेच अनेक नगरसेवकांना चार वर्षात एकही पद मिळाले नाही. त्यांना सत्ता आल्यानंतर पद देणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच नगरसेवकांच्या मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुण न्याय देण्याबाबतची ग्वाही देखील भाजप पिंपरी चिंचवड़ प्रभारी माधुरी मिसाळ यांनी दिली.
दरम्यान, दापोडी, कासारवाडी, वल्लभनगर या मंडळाचे प्रभारी- आमदार सुनील कांबळे यांनीही आढावा घेतला.