Breaking-newsपिंपरी / चिंचवड
नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस धावणार घरी – पोलीस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांचा विश्वास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/IMG-20180816-WA0188.jpg)
पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी सक्षम, आयुक्त आर.के.पद्यनाभन याचा दावा
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेवढा पोलीसाचा फाैजफाटा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसापर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचणार असून केवळ नंबर डायल करा, पोलीस हजर राहतील, असा विश्वास पोलीस आयुक्त आर.के. पद्यनाभन यांनी व्यक्त केला.
15 आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलीस आयुक्त सुरु करण्यात आले. त्यानंतर आज (गुरुवारी) ते पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात आयुक्त आर.के.पद्यनाभन हे बोलत होते.
औद्योगिकनगरीचे गुन्हेगारीत रूपांतर झाले असल्याचे बोलले जात आहे, अशा परिस्थितीत आपण पिंपरी चिंचवड शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमके काय करणार? या प्रश्नाला आयुक्त पद्मनाभन यांनी उत्तर देताना म्हणाले की, स्वतंत्र पोलीस आयुक्त झाल्यामुळे पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. स्वतंत्रपणे विविध विभागाचे काम चालणार आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील. जनता पोलिसांकडे नाही तर पोलीस जनतेकडे जातील, अशा पद्धतीने पोलीस आयुक्तालयाचे कामकाज केले जाणार आहे.
एखादी घटना घडते, त्यानंतर पाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दखल घेतली तर जो परिणाम जाणवतो, तो परिणाम अर्धा तासाने दखल घेतल्यानंतर जाणवत नाही, आणखी काही तासांनी दखल घेतल्यानंतर वेगळाच परिणाम दिसून येतो. घटना एकच परंतु परिणाम वेगवेगळे दिसून येतात. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून दखल घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. चौका चौकांत पोलीस असतील, कायदा, सुव्यवस्थेच्या दक्षतेसाठी पोलीस कायम सज्ज आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा शहराची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. त्यादृष्टीने योग्य नियोजन केले जाणार आहे. विविध शहरांत काम केल्याचा अनुभव गाठीशी आहे़ येथे काम करताना तो अनुभव निश्चितच कामी येईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/20180816_162442-300x225.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/20180816_162421-1-300x225.jpg)