नगरसेवक तुषार हिंगे वाढदिवसानिमित्त संभाजीनगरला फुड फेस्टिवलचे उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर येथील शिवशाहू उद्यानासमोरील मैदानात फुड फेस्टिवल, आठवडे बाजार तसेच बालजत्रा भरविण्यात आली आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक नामदेव ढाके, तुषार हिंगे, शहर प्रवक्ते अमोल थोरात तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी यावेळी आठवडे बाजारात सहभागी झालेल्या प्रत्येक स्टॉलधारकाशी संवाद साधत त्यांच्याशी चर्चाही केली. या आठवडे बाजारामुळे संभाजीनगर, शाहुनगर परिसरातील नागरिकांना ताजी आणि स्वत दरात भाजीपाला मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत भाजीपाला उपलब्ध करू दिल्याबद्दल तुषार हिंगे यांचे आमदार जगताप यांनी कौतुक केले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी येथील फुड फेस्टिवलला देखील भेट दिली. या फेस्टिवलच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक चांगले व्यासपीठ नगरसेवक तुषार हिंगे यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्ही आमदारांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही प्रभागातील नागरिकांसाठी अशा प्रकारचे फेस्टिवल, महोत्सव सुरू ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.