ध्वजारोहणाला जाण्याआधीच भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/1452.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रजासत्ताकदिनासाठी शाळेत झेंडावंदनला जाण्यासाठी लवकर उठून तयारी करण्यासाठी बाथरूमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा बाथरुममध्येच गुदमरून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे घडली.
अभिषेक नवनाथ पांडे (16) आणि आदित्य नवनाथ पांडे (12) असे या मृत भावंडांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी शाळेत ध्वजारोहण असल्यामुळे अभिषेक आणि आदित्य तयारी करत होते. दोघेही घराशेजारी असणाऱ्या बाथरूमध्ये अंघोळीसाठी गेले होते. याचवेळी दरवाजा बंद केल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, बराच वेळ झाला तरी मुले परत न आल्याने आई त्यांना बोलावण्यासाठी गेली असता दोघेही बाथरूमध्ये निपचित पडले होते. त्यांना तातडीने घोडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.