धमक्यांना आम्ही घाबरत नाही, काय चाैकशा करायच्या त्या करा – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/12-7.jpg)
स्मार्ट सिटीच्या सुमारे ५२० कोटींच्या निविदा प्रक्रियेत कोट्यावधीचा घोटाळ्याचा आरोप
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या विविध सुमारे ५२० कोटींच्या निविदा काढल्या आहेत. त्या कामांत शहरातील भाजपा नेत्यांनी संगनमताने कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसने नुकताच केला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, धमक्यांना आम्ही घाबरत नाही. काय चाैकशा करायच्या त्या त्यांनी कराव्यात, असं खुले आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.
आकुर्डीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापाैर उषा ढोरे, उपमहापाैर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही. ही कर्जमाफी शेतक-यांना पीकविम्यावर मिळणार आहे. परंतू, नेटशेड, विहीरी कर्ज माफ होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आमदारांना 30 लाखांचे कर्ज, चंद्रकांतदादांचे समर्थन
राज्यातील आमदार आता स्वतःसाठी ३० लाख रुपयांपर्यंतची आलिशान गाडी घेऊ शकणार आहेत. गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचे ५ वर्षांचे व्याज राज्य सरकार भरणार आहे. पूर्वी आमदार १० लाख रुपयांपर्यंतची गाडी घेऊ शकत होते. त्यात २० लाखांची वाढ केल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यावर पाटील म्हणाले की, आमदारांना गाडी तर आवश्यकच आहे. असं म्हणून त्यांनी त्या निर्णयाचे एक प्रकारे समर्थनच केले आहे.