दोनशे मजूरांचा जीव धोक्यात, स्मशानभूमीची कामे सुरु करा, अधिका-यांचे ठेकेदारांना वर्कऑर्डर
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारावर फाैजदारीचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-1-2.jpg)
पिंपरी-चिंचवड शहरावर करोनाची दहशत असताना महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी स्मशानभूमीच्या स्वच्छता, माळीकाम, देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या ठेक्याचे नवे आदेश काढत या कामासाठी दीडशेहून अधिक कामगारांना कामावर हजर राहण्याचे आदेश फर्माविले आहेत. एका बाजूला महापालिकेतील कर्मचार्यांची संख्या 5 टक्क्यांवर आणली असताना या अधिकार्याने केलेल्या पराक्रमामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील स्माशानभूमींची साफसफाई, देखभाल दुरुस्ती, सरक्षा आणि माळीकाम केले जाते. या कामांचा शहरातील विविध ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या ठेकेदारांकडील अनेक कामगार गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून गायब झाल्याचे समोर आले आहे. तर राज्य आणि केंद्र शासन अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये, असा आग्रह धरत आहे. शहरात करोनाच्या संशयास्पद रुग्णांची संख्या वाढत असून दीड हजारांहून अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
एका बाजुला अत्यंत गंभीर स्थिती असताना आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी शुभम आणि जय भवानी या दोन ठेकेदारांना शहरातील स्माशानभूमींची साफसफाई, देखभाल दुरुस्ती, सरक्षा आणि माळीकाम करण्याचा ठेका दिला आहे. तसेच आजपासून (1 एप्रिल) सर्व कामे करण्यासाठी ठेकेदाराने कामगारांना हजर करावे, असे निर्देश दिले आहेत. एका ठेकेदाराकडे किमान 80 ते 100 मजूर काम करत असून या दोन्ही ठेकेदारांचे मजूर बाहेर पडणार आहेत. करोनाची पार्श्वभूमी, महापालिकेतील कर्मचारी कपात, शहरातील दहशतीचे वातावरण असा प्रकार असताना रॉय यांनी केलेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.