दूषित पाणी पुरवठाप्रश्नी अधिकाऱ्यांना घेराव ; दिघीतील कृष्णानगरच्या तक्रारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pcmc-water3_201808118056.jpg)
पिंपरी – दिघी व परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत दिघीच्या कृष्णानगर येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी घेराव घातला. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने जाब विचारला.
दिघी परिसरातील कृष्णानगरमध्ये मागील एक महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी भोसरीतील ई प्रभाग विभागीय पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या सारथी योजनेवर तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे नियमानुसार सारथीवर आलेल्या नागरी समस्या एक महिन्याच्या आत सोडवून तक्रारदारांचा अभिप्राय घेतला जातो. नंतरच ती तक्रार बंद केली जाते. असा स्पष्ट नियम महापालिकेने केला असला तरी दिघीतील कृष्णानगर भागातील रहिवाशांनी महिन्यापूर्वी दाखल केलेली दूषित पाणी समस्येची तक्रार सोडवली तर नाहीच शिवाय दाखल केलेली तक्रार कुठलाही अभिप्राय न घेता बंद करण्यात आली. ही माहिती जेव्हा नागरिकांना समजली तेव्हा नागरिकांनी थेट आयुक्तांना जाब विचारण्याची आक्रमक भूमिका घेतली.
दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार कृष्णानगरमधील नागरिकांनी एक महिन्यापूर्वी केली होती. महिना संपल्यामुळे समस्या न सोडवताच सदर तक्रार बंद केल्याने रवी चव्हाण, सिकंदर मनियार, आनंद पाटील, चंद्रकांत देशमुख, शरद पाटील, डॉ. मधुकर गावंडे, काशिनाथ जाधव, अनिल गायकवाड, गुलाब हुसेन शिलेदार, केशव वाघमारे, मंगेश कारले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूषित पाणीपुरवठा प्रश्नी निवेदन दिले.
दिघीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती घेतली आहे. तेथील दूषित पाणीपुरवठा होत असलेली दहा ते पंधरा जोड बंद करण्यात आले आहेत. परत त्या परिसरात खोदकाम करून समस्या लवकर सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीचे काम सुरू केले आहे. तक्रार बंद का करण्यात आली याचे कारण कार्यकारी अभियंता यांना मागितले आहे.
– आयुब पठाण, मुख्य कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका