breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिघीत गॅस सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू, सात चिमुकल्यांसह 13 जण जखमी

भोसरी – दिघी येथे सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात 13 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. जखमी व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रभर गॅस सिलेंडरमधून गॅस लिकेज झाल्याने हा स्फोट झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दिघी आणि भोसरीच्या हद्दीवर असलेल्या महादेवनगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये घडली.

ज्ञानेश्वर टेमकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. टेमकर यांच्या पत्नी मंगला टेमकर (वय 27), मुलगी अनुष्का टेमकर (वय 7), मुलगा यशश्री टेमकर (वय अडीच वर्ष), श्री सातपुते, सौ सातपुते, सातपुते यांचा मुलगा आणि मुलगी अशी एका घरातील जखमींची नावे आहेत.

दुस-या घरात पाचजण जखमी झाले आहेत. यामध्ये महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय 35), मुलगी आकांक्षा सुरवाडे (वय 15), मुलगी दीक्षा सुरवाडे (वय 13), मुलगा अमित सुरवाडे (वय 8) हे जखमी झाले आहेत.

दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये भिंत पडली आहे. अशी वर्दी रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार, भोसरी अग्निशमन विभागाचे सिनियर फायरमन राजेंद्र गवळी, फायरमन विजय घुगे, श्रावण चिमटे, अभिषेक डिगे, हनुमंत पुरी, अनिल वाघ हे जवान एक बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे दोन बंब दाखल झाले.

हा प्रकार केवळ भिंत पडल्याचा नसून गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. घटनेत एकूण 13 जण जखमी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये तीन पुरुष, तीन महिला, दोन मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे.

हा स्फोट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 102 मध्ये टेमकर यांच्या घरात झाला होता. शनिवारी रात्री टेमकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर सुरु राहिला. रात्रभर सिलेंडरमधून गॅस लिकेज होत राहिला. रविवारी पहाटे घरातील व्यक्तींनी गॅस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गॅसचा स्फोट झाला. टेमकर कुटुंबातील चौघेजण यात जखमी झाले. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी टेमकर यांच्याकडे श्री व सौ सातपुते आणि त्यांची दोन मुले असे चार पाहुणे आले होते. ते चौघे देखील या स्फोटात जखमी झाले आहेत.

या स्फोटाची दाहकता शेजारच्या फ्लॅट क्रमांक 103 मध्ये पोहोचली. त्या फ्लॅटमध्ये सुरवाडे कुटुंब राहत आहे. सुरवाडे पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा देखील यात जखमी झाले आहेत.

दोन्ही घरातील सर्व साहित्याची पडझड झाली आहे. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. टेमकर यांच्या कुटुंबातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button