दहा ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन
- महापौर राहूल जाधव यांनी दिली माहिती
- बालचित्रपट, लघुपट पाहण्याची विनामुल्य संधी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जरी बालदिन साजरा होत असला तरी या दिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीकडून तीन दिवसीय बाल चित्रपट महोत्सव भरविण्यात येणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांना बालचित्रपट, लघुपट पाहण्याची विनामुल्य संधी मिळणार आहे, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत आज बुधवारी (दि. 14) दिली.
बालचित्रपट महोत्सव दि. 23, 24 आणि 25 नोव्हेंबर या कालावधीत भरविण्यात येत आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील कार्निवल सिनेमा येथे महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत दहा ते 13 वयोगटातील मुलांसाठी बालचित्रपट प्रसारित केला जाणार आहे. तर, दुपारी साडेबारा ते दोन या वेळेत भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हाच प्रयोग प्रसारित होणार आहे. दरम्यान, सकाळी नऊ ते साडेदहा आणि दुपारी दीड ते पावनेतीन या वेळेत चिंचवड येथील सायन्स पार्क येथे दहा ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी लघु चित्रपट प्रसारण आणि गटचर्चा होणार आहे. तर, अकरा ते दुपारी चार दरम्यान कासारवाडी येथील फोर्ब्ज मार्शल याठिकाणी सिनेमाची कार्यशाळा होणार आहे. त्यामध्ये केवळ तेरा ते पंधरा वयोगटातील मुलांनाच प्रवेश घेता येणार आहे, अशीही माहिती महापौर जाधव यांनी सांगितली.
शनिवारी (दि. 24) सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत पुन्हा चिंचवड येथील कार्निवल सिनेमा येथे बालचित्रपट प्रसारण दाखविले जाणार आहे. नऊ ते सव्वादहा आणि दुपारी दीड ते पावनेतीन या वेळेत सायन्स पार्क येथे अनुक्रमे लघुचित्रपट प्रसारण आणि गटचर्चा होणार आहे. तर, दहा ते बारा आणि दोन ते चार या वेळेत ऑटो क्लस्टर येथे व्हिजुअल इफेक्ट्स इन फिल्म व कार्यशाळा होणार आहे. रविवारी (दि. 25) सकाळी नऊ ते सव्वादहा आणि दीड ते सव्वातीन या वेळेत सायन्स पार्क येथे पुन्हा गटचर्चा आणि लघु चित्रपट प्रसारण होणार आहे. दहा ते दुपारी बारा आणि दुपारी दोन ते चार या वेळेत निगडीतील सिटी प्राईड स्कूल येथे व्हिजुअल इफेक्ट्स इन फिल्म व कार्यशाळा होणार आहे. त्यामध्ये तेरा ते पंधरा वयोगटातील मुलांनाच प्रवेश मिळणार आहे.
या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नावाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी 020-39858605 यावर सोमवार ते शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन फोर्ब्ज मार्शल कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत अधिकारी प्रवीण तुपे, विना जोशी, मिलींद गायकवाड आदी उपस्थित होते.