दररोज शंभर एमएलडी पाण्याच्या गळतीमुळे पाणी पुरवठा विस्कळीत – महापाैर राहूल जाधव यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC_2261-copy.jpg)
पालिका पाणी पुरवठा अधिका-यांचे अपयश
नियोजनाअभावी पाण्याची होतेय टंचाई
पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी मंजुरीपेक्षा जास्त म्हणजे दररोज पाचशे एमएलडी पाणी धरणातून उचलले जात आहे. मात्र, विविध कारणांनी शंभर एमएलडी पाण्याची गळती होवू लागली आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यावर पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कसलेही नियोजन करीत नाहीत. दरवर्षी नेहमीप्रमाणे कारणे देवू लागले आहेत. याचा फटका शहरातील नागरिकांना बसून पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तात्काळ नियोजन करुन नागरिकांना सुरळीत व पुरेशा पाणी द्या, अशा सुचना महापाैर राहूल जाधव यांनी केल्या.
महापालिकेच्या महापाैर दालनात शहरातील पाणी टंचाईबाबत पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांसमवेत आज (मंगळवार) बैठक पार पडली. यावेळी स्थायी सभापती ममता गायकवाड, इ प्रभाग अध्यक्षा भीमाताई फुगे, नगरसेवक तुषार कामठे, सागर गवळी, सहशहर अभियंता आयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, रविंद्र पवार उपस्थित होते.
महापाैर जाधव म्हणाले की, निगडी प्राधिकरणातील आठ प्रभागात वेळवर पाणी पुरवठा होत नाही. अ, ब, क, ़़ड आणि इ प्रभागात पाण्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. पवना बंद जलवाहिनीचा निर्णय लवकरच घेणार आहोत, जमिन बाधित आणि मावळातील शेतक-याशी सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच पवना धरणातून पाणी उचलण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याशिवाय पवना धरणातून बंद पाणी आणण्यासाठी बंद पाईपलाईन नसल्याने 20 टक्के पाणी गळती होवून ती थांबविल्यास शहराला आणखी गळतीचे पाणी वापरण्यास मिळणार आहे.
तसेच शहरात अमृत योजनेतून चोवीस बाय सात योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामाचा सर्व्हे चालू आहे. प्रत्येक भागाची लोकसंख्या, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करुन नियोजन केले जात आहे. त्या योजनेतून पाईपलाईन बदलण्याचे काम चालू आहे. सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्याने कामे संथ गतीने चालू आहेत. पुर्वीचे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे तातडीने भरुन घेण्याच्या सुचना केलेल्या आहेत.
भामा-आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यासाठी देहू येथून पाणी उचलण्यात येणार आहे. यासह जाधववाडी, बो-्हाडेवाडी, वाकड अन्य ठिकाणी आठ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपुजनही केले जाणार आहे. असेही जाधव यांनी सांगितले.