breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

दररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा

  • भाजपच्या कार्यकाळात नागरिकांच्या मानगुटीवर पाणीकपात कायम
  • प्रशासनाच्या भूमिकेला सत्ताधा-यांचा सशर्त पाठिंबा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गेल्या सहा महिन्यांपासून होणा-या गडूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या अशा गंभीर अजारांपासून यातना भोगण्यास जबाबदार ठरलेले पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांची पदाधिका-यांनी आज बैठकीत उलटतपासणी घेतली. मात्र, याबाबतचे स्पष्टीकरण देताना तांबे यांची पाचावर धारण बसली. याबाबत महापौर माई ढोरे यांनी तर पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक झालीच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. शेवटी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने दररोज पाणी पुरवठा केव्हा सुरू करणार ?, असे विचारले असता त्यांनी चक्क मौन बाळगले. त्यामुळे भाजपच्या सुवर्णकाळात नागरिकांच्या मानगुटीवर पाणीबाणी कायमची लादली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात गेल्या सहा महिन्यांपासून गडूळ पाणी पुरवठा होत आहे. निगडी सेक्टर 23 येथील जलशुध्दीकरण प्रकल्पात क्लोरिनयुक्त पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट संपले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून काही भागातील नागरिकांना गडूळ पाणी पुरवठा केला गेला. गडूळ पाण्यामुळे शहरात गॅस्ट्रो, जुलाब, उलट्यांची साथ पसरली. नाहक नागरिकांना या आजारांच्या मरणयातना सहन करावा लागल्या. याबाबत दोन महिन्यांपूर्वी याचा जाब विचारला असताना पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी पाणी शुध्द असून हे पाणी गरम करून पिण्याचा शहरवासियांना सल्ला दिला. आजही अशीच परिस्थिती असल्याने पाणी पुरवठा विभागाच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेण्यात आली. तांबे यांना गडूळ पाण्यासंदर्भात उपमहापौर तुषार हिंगे यांनी विचारले असता त्यांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे हिंगे यांनी भर बैठकीत तांबे यांच्या भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध करत सभागृहाचा त्याग केला.

सत्ताधारी आणि अधिकारी यांच्यात आर्थिक हितसंबंध ?

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती घेण्यासाठी महापौर माई ढोरे यांना विचारले असता त्यांनी ही बैठक झालीच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्यांनी सविस्तर माहिती देण्यास सुरूवात केली. तांबे यांना काही प्रश्न विचारण्यात आले असून त्याची उत्तरे देण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. संबंधित प्रश्नांची उत्तरे त्वरीत देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण तांबे यांनी बैठकीत दिल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले. शेवटी शहरातील नागरिकांना पूर्णवेळ म्हणजेच दररोज नित्यनियमाने पाणी पुरवठा केव्हा करणार ?, असे विचारले असता त्यावर महापौरांनी बोलण्यास नकार दिला. या मुद्यावर मौन बाळगून पुढील बैठकीत जो काही निर्णय होईल, त्यानुसार अंमलबजावणी होईल, असे स्पष्टीकरण माईंनी दिले. अशी भूमिका घेऊन महापौरांनी अधिकारी तांबे यांना एकप्रकारे पाठीशी घातले आहे. त्यामुळेच त्यांना जाब विचारण्याची धमक नसल्याचे दिसते. यावरून सत्ताधारी आणि अधिकारी यांच्यात आर्थिक हिंतसंबध जोपासले जात असल्याचा संशय बळावला आहे.

बैठकीला महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक तुषार कामठे, अभिषेक बारणे आदी बैठकीत उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button