तीन लाखाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण आणि सुटका
पिंपरी, (महाईन्यूज) – तीन लाखांच्या खंडणीसाठी चार भामट्यांनी एका तरुणाचे अपहरण करून सुटका केल्याचा प्रकार चिंचवडमध्ये घडला. गुरूवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
ओंकार ज्ञानदेव वटाणे (वय 24, रा. चिंचवड) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यशवंत ताडीवाल, चंदू कांबळी यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील चार भामट्यांनी चिंचवडमधील केसर हॉटेल समोरून ओंकारचे अपहरण केले. जबदस्तीने मोटारीत बसवून त्याला दमदाटी केली. सुटका करण्यासाठी त्याच्याकडे तीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार देताच त्याला मारहाण केली. काहीच साध्य होत नसल्याने ओंकारला चिंचवड येथे सोडून भामट्यांनी पोबारा केला. त्यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.