breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ताथवडे, पुनावळे, भूमकर चौकात सब-वे करा’, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पिंपरी महाईन्यूज

महापालिका हद्दीतील मुंबई – बंगळुरू महामार्गावर ताथवडे आणि पुनावळे येथे नविन सब-वे विकसित करण्यात यावा. भूमकर चौक, वाकड येथेही नवीन सब- वे करावा. महापालिका हद्दीतील वाकड ते रावेत किवळे सर्व्हिस रस्ता विकसित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन गटनेते राहुल कलाटे यांनी शहरातील रस्त्याबाबत निवेदन दिले. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, ”पिंपरी- चिंचवड शहराचा औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्क व मुंबई- पुणे बंगलोर हायवे जवळ असल्याने हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या परिसरातून मुंबई-बंगळुरू ,पुणे- हैदराबाद,पुणे -नाशिक,पुणे -अहमदनगर रस्ता इत्यादी महत्वाचे रस्ते जात असल्याने या भागात वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. याबाबींचा विचार करून या भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी कामे करणे आवश्यक आहे.

मुंबई -बंगळुरू बाह्यवळण रस्ता वाकड ते किवळेपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरामधून जात आहे. याठिकाणी रहिवाशी भाग वाढत असल्याने गृहनिर्माण संस्था निर्माण होत आहेत. या रस्त्यावर भुमकर चौक या ठिकाणी या रस्त्याच्या दोन्ही बाजूस महापालिका विकास आराखड्यातील 45 मीटर रुंदीचा रस्ता महापालिकेमार्फत विकसित करण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणामार्फत या ठिकाणी 2 लेनचा सबवे विकसित केलेला आहे. हा सब-वे सद्य स्थितीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अपुरा पडत आहे. त्यामुळे या सब-वे खाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी 4 लेनचा सबवे विकसित करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना पिंपरी-चिंचवड महापालिका मार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. याबाबत लवकरात-लवकर निर्णय घेऊन 4 लेनचा सब-वे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत विकसित करण्यात यावा.

पुनावळे व ताथवडे येथील सब-वे कमी उंचीचे व कमी रुंदीचे असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वरील दोन्ही ठिकाणी नव्याने 4 लेनचा सब-वे तयार करणे आवश्यक आहे. या सब-वेची रुंदी व उंची वाढविणे आवश्यक आहे. याबाबतही महापालिकेमार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे. या रस्त्याची पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 8.60 किमी लांबी व 60 मीटर रुंदी आहे. त्यालगत दुतर्फा 12 मी रुंदीच्या सेवा रस्त्याचे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये समावेश आहे.

या भागातील झपाट्याने होणारा विकास पाहता या सेवा रस्त्याचे विकसन करणे आवश्यक आहे. जेणेकरून या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांची तसेच माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील घटकांची सोय होणार आहे. सध्याचा महामार्ग 60 मीटर रुंदीचा असून त्यामध्ये दोन्ही बाजूस 15 मीटर रुंदीचा मुख्य रस्ता व 3 मीटर रुंदीचा रस्ता दुभाजक आहे. या रस्त्याचे दोन्ही बाजुस 12 मीटर रुंदीचा पूर्णपणे विकसित नसलेला सेवा रस्ता आहे.

परंतु, सेवा रस्ता शहरातील व मुख्य वाहतुकीस अपुरा पडत आहे. या सेवा रस्त्या लगत असणारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील 12 मीटर रुंदीचा सेवा रस्ता व महामार्ग लगत असणारा 7.50 मी रुंदीचा सेवा रस्ता एकत्रितपणे विकसित करावा. जेणेकरुन या रस्त्याचे पावसाळी पाणी वाहिन्या, मैलापाणी वाहिन्या, जलवाहिन्या व विविध सेवा वाहिन्यांचे एकत्रित सुयोग्य नियोजन करणे सोईस्कर होईल. सेवा रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होऊन, मुख्य रस्त्यावरील अतिरिक्त वाहतूक कमी होण्यास मदत होईल. तसेच हा सेवा रस्ता महामार्गालगतच्या उपनगरातील वाहतुकीस उपयुक्त होईल.

भूमकर चौक येथील सब-वे 4+4 लेनचा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत लवकरात लवकर विकसित करण्याचे काम हाती घेण्यात यावे. ताथवडे व पुनावळे येथील जुने अरूंद सब-वे काढून या ठिकाणी नविन 4+4 लेनचे नविन सब-वे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे मार्फत विकसीत करणेत यावे. महापालिकेच्या हद्दीतील सेवा रस्ता एकत्रितपणे विकसीत करण्यात यावेत. या भागातील वाहतूक व्यवस्था व वाढणारे नागरिकरण लक्षात घेता काम लवकरात-लवकर करण्याकामी संबंधितांना सुचना द्याव्यात, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button