तळवडे-चिखलीतील नागरिकांना ऑक्टोबरमध्ये भामा आसखेडचे पाणी!
![Water of Bhama Askhed to the citizens of Talwade-Chikhali in October!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/111111111111110000000000.jpg)
- आमदार महेश लांडगे- आयुक्त श्रावण हर्डिकर यांची महत्वपूर्ण बैठक
- पाणी समस्या निकालात निघण्यास होणार मदत
पिंपरी । प्रतिनिधी
आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पातून तळवडे-चिखली परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मे महिन्याच्या अखेरीस ‘रॉ-वॉटर’ उपलब्ध होईल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत शुद्ध पाणी देण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे.
समाविष्ट गावातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा असलेला पाणीपुरवठा सक्षम करण्याबाबत आणि प्रस्तावित प्रकल्पाला गती देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने नुकतीच बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित् विभागाचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वाढीव पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४ किलोमीटर पाण्याची लाईन मंजूर करण्यात आली आहे. देहू गाव ते भंडारा डोंगरापर्यंत हे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. कामाला गती मिळण्यासाठी आणि भूसंपादन करण्यासाठी समितीची नेमणूक केली जाणार आहे. पाणी सर्वत्र वितरित कसे करायचे किंवा त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठीची प्रक्रिया त्वरित सूर करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. तसेच, प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्त श्रावण हर्डीकर बैठक आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हाचे पालकमंत्री आमदार यांच्यासोबत देखील बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, हे सर्व निर्णय झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार व आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून निवृत्त आयुक्त किंवा निवृत्त तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे तळवडे चिखली परिसरातील नागरिकांची तहान भागणार आहे.