तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा… म्हणून पोलिस आयुक्त संतापले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/1-1-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथील काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या फोटोमुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश चांगलेच संतापले. सोमवारी (दि. १९) सकाळी त्यांनी चॅनेलवरच (वॉकी टॉकी) संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची झाडाझडती घेतली. तसेच, आगामी काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तंबीही दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एमआयडीसी भोसरी ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून गोंधळ घातला. याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तसेच, याव्यतिरिक्त शहरातील काही ठिकाणी टोळके राडा करीत असल्याच्या तक्रारी देखील पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत त्यांनी सोमवारी सकाळी थेट चॅनेलवरच झाडाझडती घेतली. कृष्ण प्रकाश यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
म्हणून… पोलिस आयुक्त संतापले
‘तलवारीने केक कापताना जेवढे सामील होते त्या सर्वांवर कारवाई करा. त्यांनी परवानगी घेतली होती का, ते रस्त्यावर आलेच कसे, वाढदिवस साजरा करण्यासाठी चौक किंवा रस्ता असतो का, त्यांच्यावर योग्य कलम न लावता जुजबी कलमा अंतर्गत कारवाई झाली आली. हे फार चुकीचे आहे हे संबंधितांनी नीट लक्षात घ्यावे. आशा विकृतींना समाजात नाही गजाआड ठेवल पाहिजे. आगामी काळात अशा प्रकारची एकही चूक होता काम नये. अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे आता आमचे काही खरं नाही. ज्या चौकात ते दहशत पसरवतात त्यांना तेथेच ठोकले पाहिजे. ते कसे काय गर्दी करून दहशत पसरवू शकतात. त्या चौकात त्यांचे राज्य आहे का, पण हे लक्षात ठेवा चौक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. कुणाच्या बापाचा नाही. तसेच, काहीजण दुचाकीचा आवाज काढत फिरतात. फॅन्सी नंबरप्लेट लावून रॅश ड्राईव्ह करतात. त्यांच्यावरही कारवाईची मोहीम राबवा. जर पुन्हा माझ्याकडे तक्रारी आल्या तर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाची त्यांच्या हद्दीवर पकड नाही, असे समजून मेमो दिला जाईल. त्यानंतर मी काय कारवाई करता ते तुम्ही बघालच’